गुरूपौर्णिमा

शिष्य होण्याची प्रेरणा देणारा उत्सव
गुरूविना दैवत नाही
गुरूविना भक्ती शक्ती नाही
गुरुविना ज्ञान, ज्ञान हे अज्ञानी
गुरूविना भक्ती मुक्ती नाही
गुरूचीही शक्ती भक्ती लागे
म्हणूनी भजावे गुरू लागे
हेचि दैवत दैवत मनी
तेचि माझे ध्यानी तेचि मनी
अशा प्रकारचे उद्गार शिष्याचे मुखातून निघणारा व गुरूची आठवण होणारा
पूजन करण्यास योग्य असा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.
आषाढी पौर्णिमेचा हा दिवस गुरूपौर्णिमा व व्यास जयंती म्हणून साजरा
केला जातो. यालाच व्यासपौर्णिमा नावानेही संबोधितात. माणसाला कोणतेही ज्ञान
मिळविण्यासाठी त्या ज्ञानाने संपन्न अशा व्यक्तीकडून घ्यावे लागते अशा ज्ञानसंपन्न
व मार्गदर्शन विभूतिना गुरू असे म्हणतात. आत्मज्ञानाच्या साक्षात्कार घडविणाऱ्या
गुरूला किती मान दिला पाहिजे? हाच पूज्यभाव व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
संत कबीरांनी गुरुला कुंभाराची उपमा दिली आहे. शिष्य कच्च्या मातीसारखा
असतो. गुरूरूपी कुंभार ती माती मळून मळून तयार होणाऱ्या चिखलाला थोपटून
थोपटून सुंदर आकार देतो. “गु” म्हणजे अंध:कार, अज्ञान, अविवेक आणि “रु”
म्हणजे दूर करणारा, नाहीसा करणारा, समाप्त करणारा तेव्हा गुरू म्हणजे जो
शिष्याच्या मनात असलेला अंध:कार, अज्ञान दूर करतो व ज्ञानाचा प्रकाश देवून
शिष्याचा दैनंदिन कारभार पाहणारा, शिष्याला सर्वतोपरी उचलून धरणारा व त्याला
योग्य वेळी मार्गदर्शन करणारा होय.
गुरू अत्यंत कृपाळू शिष्याची प्रगती न झाल्यास उत्तम गुरु ते स्वत:ला
लज्जास्पद मानतात. शिष्याला विविध शारिरीक, मानसिक किंवा अध्यात्मिक
संकटात मार्गदर्शन करतो. प्रसंगी स्वत: संकल्प, जप इ. साधना करतात. वैदिक
काळापासून आजपर्यंत सातत्याने चालू असलेला ऋषिमुनींच्या परंपरेतील शेवटचा
दुवा म्हणजे ‘गुरु’. अनंत काळापासून चालत आलेल्या ज्ञानाची मशाल तो सतत
तेवत ठेवतो व नंतर हाच संदेश अनंत काळपर्यंत पुढे नेण्यासाठी आपल्या योग्य
शिष्याचे हाती ही मशाल सोपवितो.
पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पूर्ण विकास झालेला असतो. गुरुंचा ज्ञानचंद्र पण
पूर्ण विकसित होऊन सतत चमकत असतो. त्यामुळे शिष्याच्या अंत:करणातील अज्ञान
अंध:कार नष्ट होतो. चातुर्मास सुरु होतो. गुरु हे ज्ञान व धर्म प्रचारासाठी या मुहूर्तावर
आश्रमाबाहेर पडतात. चार महिने परत येत नाहीत. म्हणून यादिवशी ‘गुरुपूजन’
करावयाचे. म्हणून साधनेची सुरुवात करण्यास हा अत्यंत शुभदिवस. गुरुपुजा ही
व्यक्तिपुजा नसून गुरुशिष्य परंपरेची पूजा आहे. गुरुकृपेच्या सहवासामुळे वासनांची
कवचे हळूहळू वितळून जातात व शेवटी राहते ते आपलेच स्वरुप.
असा हा पूजनीय गुरु सुद्धा महनीय असावा. गुरुजवळ मान, ज्ञान आणि
तेज असावे, त्याची दृष्टी निर्मळ आणि मंगल असावी. आई वडील हे भौतिक शरीर
देत असले तरी गुरु हे मानसिक आणि बौद्धिक गुण देतात. शिक्षक हा देखील
अग्निसारखा मर्यादा राखणारा आणि मुलांना ऊब देणारा असावा. गुरुच्या जीवनात
ज्ञानाचे आणि जीवनाचे गुरुत्व आलेले आहे. अशा गुरुजवळ गेल्याने बुद्धि निर्मळ
होते. हृदय कोमल बनते तर जीवन ही सुगंधित होते. गुरु जो दुसऱ्यांच्या उत्कर्षाची
सतत चिंता करीत असतो नव्हे त्याला चिंता लागून रहाते. प्रेम, वात्सल्य यांनी परिपूर्ण
आणि तेजस्वी गुरुला पाहताच विद्यार्थ्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला पाहिजे असाच
गुरु ज्ञान देण्यास समर्थ ठरेल.
गुरु आपणास मनापेक्षाही जवळ आहे. भक्तीच्या रेशमी धाग्यांनी तुमचे मन
गुरुचरणास बांधून टाका: शुद्ध प्रेमाच्या पाण्याने गुरुंचे चरण धुवून काढा, आपल्या
दैवी गुणांच्या फुलांच्या गाळेने गुरुस सुशोभित करा. आई-वडील, बहिण-भाऊ,
सगे-सोयरे ही सर्व नाती गुरुमध्ये एकत्रित होतात. सांसारिक सुरुवात या नात्यात
मनुष्य गुरफटतो, परंतु गुरु या सर्व बंधनांपासून मुक्त करतो. गुरुचरण हेच मोक्ष.
प्राप्तीचे ठिकाण आहे. गुरुचा प्रेमळ कृपाकटाक्ष म्हणजे अमृताचा वर्षाव,
गुरुत्वाकर्षणाप्रमाणे गुरुप्रेमाचे आकर्षण निर्माण झाले पाहिजे. गुरु भेट झाल्यास त्यांचा
अनादर केला, तर ते अनुचित ठरते.
शून्याच्या मागे जर आकडा नसेल तर शून्यास किंमत नाही. तसे शून्यवत
जगाला अर्थ येतो तो गुरुंमुळेच. दगडाचा देव करण्यासाठी मूर्तिकार (गुरु) त्यातील
अनावश्यक भाग काढून टाकतो. तेव्हा कुठे मूर्ती घडते. त्या दगडात मूर्ती साकारताना
पुष्कळ
सोसावे लागते, सोडावे लागते. त्यात मुळचे सौंदर्य असतेच. मूर्तिकार
हातोडयाने अनावश्यक भाग काढून टाकतो. आपले घर सुंदर असतेच, मधूनमधून
जळमटे झटकून टाकावी लागतात. त्याप्रमाणे अज्ञानी शिष्यातील अविद्येची, वासनेची
जळमटे काढण्याचे काम गुरु करतात.
अशा प्रकारे प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.
प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्यात अनेक गुरु भेटतात. व्यासांनी महाभारत लिहिले.
ते गुरुंचेही गुरु, भारतवर्षाचे गुरु मानले जातात. तामिळनाडूत जेष्ठ पौर्णिमेस व्यासपूजा
होते. दक्षिण भारतातील शंकराचार्यांच्या शृंगेरी आणि कुंभकोणम् हया पीठांत
व्यासपूजेच्या उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो.
याच दिवशी गौतम बुद्धाने धर्म चक्रपरिवर्तन केले. जैन लोकही या दिवशी
उपवास करून जिनपूजा करतात. म्हणून हिंदू, बौद्ध व जैन धर्मात हया दिवसास
विशेष महत्त्व आहे. आईच्या पुत्रप्रेमाशी बरोबरी करणारे दुसरे प्रेम म्हणजे सद्गुरुचे
शिष्यप्रेम म्हणूनच गुरुला गुरुमाऊली म्हणतात. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य
परंपरेस व माझ्या सर्व पूज्य गुरुस त्रिवार वंदन.
error: Content is protected !!