पाणी म्हणजे जीवन
भगवंतानी सृष्टी निर्माण केली, ती पंचमहाभूतांची. आपले शरीर याच म्हणजे
पृथ्वी, आप, तेज,वायू, आणि आकाश यांची पंचमहाभूते समाविष्ट असतात. मानवामध्ये
देखील हीच पंचमहाभूते समाविष्ट असतात. पंचमहाभूतांनी बनलेले असते व शेवटी ते
त्याच पंचमहाभूतामध्ये विलीन होते. या पंचमहाभूतांपैकीच आप म्हणजे पाणी होय,
मानवी शरीराला हवा, पाणी आणि अन्न या तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते.
वस्त्र, निवारा या नंतर लागणाऱ्या गोष्टी आहेत. वनस्पती, जलचर प्राणी, मानव या
सर्वांनी हवे असे जीवनावश्यक पाणीच आहे. हे खरोखरच सत्य असून ते मानावेच
लागेल.
पाण्याला रंग, रूप, रस, गंध काहीही नाही. म्हणजेच तेही परमेश्वरस्वरूप
मानावे असे आहे. परमेश्वर कसा? तर आपण पाहू तसा पानी तेरा रंग कैसा? असे
विचारले तर जिसमें मिलाओ वैसा? म्हणजे इथेही तो सगुण साकार पाहा किंवा
निर्गुण निराकार पहा मात्र सर्वांबद्दल समभाव ठेवतो. पाणी रसमय आहे. झाडांच्या
मुळांना पाणी दिले तर सर्व फांद्या-पानांतून फुलांना-फळांना मिळते. तसेच सर्व
चराचर सृष्टी पाणी घेते व आपले जीवन प्रचलीत ठेवते. आपण भारतीय तर पाणी
घेऊन वाहणाऱ्या नद्यांनाही पवित्र ठेवते. आपण भारतीय तर पाणी घेऊन वाहणाऱ्या
नद्यांनाही पवित्र मानतो. गंगेचे पाणी सर्व पाण्यात अत्यंत शुद्ध पाणी आहे, हे अखिल
जगातील शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे आणि म्हणूनच ते पवित्र मानण्याची प्रथा
आम्हा भाविक भारतीयांच्या मनात दृढ झालेली आहे. औषधं जान्हवी तोयम् ही उक्ती
किती सार्थ वाटते!
समुद्रामधील पाणी सूर्याच्या उष्णतेने तापून त्याची वाफ होते व ती वर
आकाशात गेल्यावर तिथे थंड हवा लागल्याने वायुरूप पाणी द्रवीभूत होऊन पावसाच्या
रूपाने पुन्हा पृथ्वीतलावर ओढे, नदी, नाले यांच्या रूपाने समुद्राला मिळते. हे जलचक्र
अविरत सुरू असते.असे म्हणतात की, स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पावसाच्या
पाण्याचा थेंब पडला तर त्याचा मोती होतो. हे अनमोल पाणी आपण कसे व किती
वापरतो? कसे वापरणे आवश्यक आहे? देवाने दिलेले शुद्ध पाणी आम्ही मानव
कशाप्रकारे दूषित करतो? या गोष्टींचा विचार करावा लागण्याजोगी परिस्थिती आज
निर्माण झाली आहे.
आपण पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, भांडी स्वच्छ
करण्यासाठी तसेच स्वच्छतागृहांसाठी पाणी वापरतो. जनावरे, पशुपक्षी, वनस्पतीनाही
पाणी आवश्यक आहे. असे मौलिक पाणी आम्ही विनाकाळजीने तर वापरतोच पण
अनावश्यक असे खर्चही करतो. कितीतरी वेळ ज्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध
केलेले असते, ते पाणी केवळ स्वत:च्या हलगर्जीपणाने गटारात जाते. वेळच्यावेळी
तोटी बंद करण्याची दक्षता आम्ही घेतली तर?
शेतीसाठी म्हणजे अन्न-धान्य पिकवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. म्हणून
पाटाचे पाणी ऊसाचे शेत भरून ओढया नाल्यांतून व इतस्त्र वाहते तर आम्ही दुर्लक्षच
करतो. ठिबक सिंचन पद्धतीने किंवा आवश्यक मात्रेत पाणी देऊनही उत्तम शेती
करता येते, हे अनेकांनी सिध्द केले असूनही सर्वसामान्य माणसाने या गोष्टीकडे
जितक्या गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, तितका तो पाहत नाही.
जगातील इतर देशांत याबाबतीत अत्यंत जागरुकता दिसून येते. आपल्या
देशात तर पिण्याचे पाणी आपण ज्याला बिसलेरी वॉटर म्हणतो, ते पाणी १४/१५
रु.लिटर या भावाने घेतो. तरी देखील हा पाणी या प्रश्नाकडे एकूणच जनसामान्य,
समाजसुधारक व सरकारनेही आवश्यक त्या गांभीर्याने पाहणे आवश्यक जरुर आहे
असे म्हणत असूनही प्रत्यक्ष कृती मात्र कोणीच करताना दिसत नाही.
भूगर्भातील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. एकतर सूर्याच्या
उष्णतेचे प्रमाण वाढते आहे (ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिग संबोधतो). दुसरे म्हणजे
अफाट व बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येला लागणारे अन्न, पाणी, दूध, औषधे यांचेही
प्रमाण वाढणार. त्याला लागणारे पाणी कोठून वाढवून घेणार ? ते अखेर मर्यादितच
आहे.
हल्ली पाण्याची शेती करणे म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग विषय प्राधान्याने चर्चिला
जातो पण ती मर्यादा चर्चेपुरतीच सीमित ठेवली तर काय होईल ? असा विचार करणे
जरुरीचे आहे माणूस स्वत:ला राहण्यासाठी, कारखाने उभारण्यासाठी जंगल संपत्तीची
म्हणजे वृक्षांची तोड करुन त्यांना नष्ट करून पाऊस पाडण्यास प्रतिकूलता निर्माण
करत आहेच पण सिमेंट काँक्रीटची घरे (जंगले) उभारून जागतिक स्तरावर
तापमानही वाढवत आहोत. हे लक्षात न घेतल्यामुळे परिणामी कमी पाऊस पडणे,
पाण्याचे बाष्पीभवन होणे यासारख्या समस्या भेडसावत आहेत. शिवाय निरनिराळ्या
उद्योगधंद्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, औषधांच्या निर्मितीसाठी खूप प्रमाणात पाणी
वापरले जाते. यावर संशोधन करून पाणी वापराचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता
येईल. तसेच या सर्व औदयोगिक प्रक्रियेतील सांडपाणी पुन्हा नैसर्गिक पाण्याच्या
ओघात मिसळल्याने ते पाणीही दूषित केले जात आहे. आज जिवंत असणाऱ्या
माणसांनी या सर्वांचा साकल्याने विचार केला नाही तर आज जसे अन्नावाचून बळी
जाताना दिसतात, तसेच किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाण्याअभावी मानव,
प्राणी, जलचर, वृक्ष आणि सर्वच जीवजंतू उन्मळून पडतील.
अजूनही वेळ गेलेली नाही. हे आव्हान समजून समाजातील सर्व स्तरांवर
पाणी या विषयावर जागरुकता व सतर्कता वाढवून प्रत्येकाने तळमळीने योग्य
उपाययोजना केली तर भावी पिढ्यांना निदान गरजेपुरते तरी पाणी मिळू शकेल. हे
सर्व आपल्याला खरोखरच करता येण्यासारखे आहे.
जर मानव पाणी निर्माण करू शकत नसेल, तर या ईश्वरदत्त पाण्याचा,
ईश्वरी प्रसादाचा आदर करणे आम्हा सर्वांना बंधनकारक आहे. नव्हे, ते आपले
कर्तव्य आहे.
यासाठी साधे-साधे उपाय करुन पाहता येतील. आम्ही जर पान-तंबाखू
खाल्ली नाही तर चूळ भरण्यासाठी लागणारे पाणी आम्ही वाचवू शकतो. कपडे हाताने
धुतले तर वॉशिंग मशिनपेक्षा कमी पाण्यात ते धुवून निघतील. आंघोळ, टॉयलेटला
वापरण्याचे पाणी पिण्याच्या पाण्यापेक्षा निराळे वापरले तर शुद्ध क्रिया केलेल्या
पाण्याची बचत होऊ शकते. शेती संदर्भात मी आधीच हे सूचित केले आहे.
युद्धकाळात जसे त्या देशातील सर्व नागरिक आणीबाणी समजून प्रत्येक
गोष्टीतील देशविघातक कृत्याचा प्रतिबंध करतात, तसेच चराचर सृष्टीच्या
संवर्धनासाठी, संरक्षणासाठी आपण सर्व प्रतिज्ञा करू या की, यापुढे आम्ही पाणी
दूषित करणार नाही.
माझा जलदेवतेला, वाहणाऱ्या नद्या-नाले, ओढे, जलनिर्मितीस सहाय्यभूत
समुद्र व सूर्यालाही नमस्कार!
error: Content is protected !!