दूरदर्शन आणि तरूण
अंध धृतराष्ट्राजवळ बसून युद्धभूमीवरील घडामोडी पाहण्याची दिव्यदृष्टी
एकट्या संजयला होती. परंतु स्थलकाळाचे बुरूज फोडून जगातील कोणतीही गोष्टी
घरबसल्या दाखविण्याची जादू दूरदर्शनने केली आहे. जॉन लॉगी बाअर्डने सर्व जग
आपल्या छोटया खोलीत आणले. दूरदर्शनचा शोध अमेरिकेत १९२६ रोजी त्यांनीच
लावला पण प्रत्यक्षात त्याला भारतात यायला १९५८ साल उजाडले व रंगीत रूप
धारण करायला १९८२ साल! या इडियट बॉक्सने सर्वांना वेडं केलं आहे. दूरदर्शन
ही श्रीमंतांची मिरासदारी राहिलेली नसून आता तर मध्यमवर्गीयांच्या घराघरातूनही
मालिका, गाण्यांचे आवाज बाहेर पडताहेत. खरंच मी तर म्हणेन.
उन्हें तो लुट लिया मिलके टी.व्ही.वालोने
केबलवालोने, सिरियलवालोंने उन्हे तो लुट लिया
मिलके चॅनल वालोंने पिक्चर वालोंने, अल्बमवालोंने
मानवी जीवनात असंख्य घडामोडींना तोंड द्यावे लागते. कंटाळवाण्या
धकाधकीच्या घटनांनी मानवी जीवन निरस बनते. दूरदर्शन ही एक अशी गोष्ट ठरली
आहे की त्याचे जेवढे कौतुक झाले तेवढेच शिव्या-शाप त्याच्या वाट्याला आहेत.
इडियट बॉक्स म्हणणारे हेच लोक रात्रंदिवस त्याच्यासमोर बसून असतात. दूरदर्शन
हे दृक्श्राव्य साधन प्रभावी आहे. त्याचा उपयोग व उपभोग हा मानवाने
सद्सद्विवेकबुद्धीने करायला हवा. पण चित्र तर उलटंच दिसतंय.
असंख्य तरुण-तरुणींच्या मनावर चित्रपटांनी, त्यातील गाण्यांनी आपले
अधिराज्य गाजवलेले दिसून येते. दूरदर्शन हे मानवी जीवनाची भलतीच बाजू रंगवीत
आहे.
चित्रपटांच्या चंदेरी दुनियेचा फार मोठा पगडा विद्यार्थी वर्गावर पडलेला
दिसतो. फॅशन, डायलॉग, वर्तन इ. बाबतही ते घडत आहे. अमुक एका नायकाचा
किंवा नायिकेचा ड्रेस पहायचा आणि शिंप्याकडे त्याच पद्धतीचा ड्रेस हवा म्हणून
आग्रह धरायचा. मुलींच्या बिंदीपासून हेअरस्टाईलपर्यंत, मुलांच्यातही मुलींसारखे
कानात डुल घालणे, चित्रविचित्र पोषाख घालून मुलीपेक्षा जास्त लांबीचे केस
ठेवणाऱ्यांचा एक संप्रदायच तयार होत आहे. मुलांच्या बाबतीत मी तर म्हणेन,
कोण होतास तू, काय झालास तू,
अरे वेडया कसा, वाया झालास तू !
आजचे तरूण ह्याच चित्रपटांच्या आहारी जावून विकृत गोष्टींना बळी पडून
स्वत:चे जीवन बरबाद करुन घेत आहेत. खून, बलात्कार, मारामारी, कर्कश गाणी
ह्यांनी हा दूरदर्शन भरकटत चालला आहे.
अनेक तरुणी हिरोईन होण्यासाठी मुंबईकडे धाव घेतात. पैसा तर जातोच
पण स्वत:ची अब्रु गमावुन ह्या सुंदर तरुणी वाईट मार्गाला लागतात. स्त्री-देहाचा
बाजार मांडला जात आहे, स्त्रीला माजघरातून बाजारात आणले जात आहे.
कामोत्तेजक प्रसंग, गुन्हेगारी, खुनी वृत्ती, वासनांना आव्हान करणारी वृत्ती ह्यामुळे
समाजजीवन विकृतीकडे वळले आहे. वाईट मार्ग पत्करणे ही ह्या इडियट बॉक्सचीच
देणगी ना!
शिक्षक-विद्यार्थी संदर्भात तर न बोललेलेच बरे. शिक्षकांची खिल्ली
उडवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरू शिष्याच्या नात्याचे भान राहिलेले नाही. कुमार वयातील
मुले-मुली किंवा महाविद्यालयीन तरुण वर्ग चित्रपट पाहण्यात इतका वेळ घालवतात
की त्यांचा ताळमेळच नाही. त्यांच्या ओठावर सारखीच गाणी, गाणी अन् गाणीच.या
सर्व दुष्परिणामांना स्वीकारूनही गेल्या तीस वर्षात दूरदर्शनने फार मोठी सामाजिक,
शैक्षणिक कामगिरी बजावली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. चित्रपटामुळे अभ्यास
होत नाही ही गोष्ट तितकीशी खरी नाही. कारण, गुणवत्ता यादीत येणारे आम्हीही
टी.व्ही.बघत होतो, असे स्पष्ट सांगतात. मिले सुर मेरा तुम्हारा, एकता की जीत है।
एक चिडिया यासारख्या गीतांतून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते. अज्ञान व
अंधश्रद्धा यावर प्रबोधन करण्याचे कार्य दूरदर्शन प्रभावीपणे करत असते. दूरदर्शनवर
शाप व ज्ञान देणारे कार्यक्रम असतात. ज्ञानदिप, हेल्पलाईन, योगा, आरोग्य संपदा,
बातम्या, सुरभि, आमची माती आमची माणसं इ. कार्यक्रम बघावेत, नुसता धांगडधिंगा
नाही.
दूरदर्शन हा मानवाला लाभलेला एकमेवाद्वितीय कल्पवृक्ष आहे. त्याची फळे
चाखतांना विधायक व विघातक हे गुण व अवगुण समजून स्वीकारावे यातून दूरदर्शन
नफा कि नुकसान यांचे एकच उत्तर मिळेल. प्रेक्षक, प्रेक्षक आणि प्रेक्षकच. होय,
प्रेक्षकांच्यावर ते अवलंबून आहे.
मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत व रात्री मुले झोपल्यावर प्रौढांसाठी असलेले
कार्यक्रम पाहण्याचा मोह टाळावा, काय पहावे? किती पहावे? केव्हा पहावे? याचे
योग्य भान ठेवले तर दूरदर्शन देवदूत वाटेल.